मेहकर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अवसान गळाले! प्रचारात नियोजनाचा अभाव; खरातांना पराभव समोर दिसतोय, पण तरीही उगाच विजयाचा आव...मतदारसंघात कुजबुज; "बुंद से गयी वो हौद से नहीं आती..."
Nov 17, 2024, 12:23 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. या लढतीत आ. संजय रायमुलकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आमदार संजय रायमुलकरांचा नियोजनबद्ध प्रचार, महायुतीच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी यामुळे रायमुलकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे एकंदरी चित्र आहे. महायुतीची हवा दिसत असल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे अवसान गळाल्याचा दावा महायुतीचे समर्थक करीत आहेत.
मेहकर विधानसभा मतदारसंघात निवडणूक घोषित व्हायच्या आधीच महाविकास आघाडीत सावळा गोंधळ सुरू होता. ऐन निवडणुकीच्या काळात मुंबईवरून येणाऱ्या सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी दिल्याने अनेक निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत, तशी नाराजी शिवसैनिकांनी जाहीरपणे याआधी व्यक्त केली आहे. जिल्हा संघटक गोपाल बच्छीरे यांनी तर सिद्धार्थ खरात यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते..आता खरात आणि बच्छीरे यांची दिल जमाई झाल्याचे वरवरून दिसत असले तरी "बुंदसे गयी वो हौदसे नही आती" अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. खरात यांच्या प्रचारात नियोजनाचा अभाव असल्याचीही चर्चा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. अनेक कार्यकर्ते खरात यांच्या प्रचार नियोजनावर खाजगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. खरात यांना स्वतःचा पराभव समोर दिसत असला तरी ते उगाच विजयाचा आव आणत असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे..
गेल्या निवडणुकीत आमदार संजय रायमुलकर यांनी ६२ हजार मतांचा लीड घेतला होता, त्यावेळी तर स्थानिक आणि बऱ्यापैकी जनसंपर्क असलेले उमेदवार आमदार रायमुलकर यांच्या विरोधात होते. यावेळी खरात यांच्या रूपाने बाहेरचे उमेदवार असल्याने रायमुलकर यांच्यासाठी ही निवडणूक गेल्या निवडणुकीपेक्षाही सोपी असेल असाही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे..अर्थात २३ नोव्हेंबरला या अंदाजावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे..