रेल्वेत नोकरीचे आमिष, बनावट जॉईनिंग लेटरचा खेळ; ६.५० लाखांचा गंडा! एसपींच्या आदेशानंतर अखेर गुन्हा दाखल; आसलगावच्या तरुणाची फसवणूक; कल्याणच्या आरोपीवर कारवाई,

 बनावट रेल्वे नियुक्तीपत्रांचे धक्कादायक रॅकेट उघड?

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रेल्वेत ज्युनिअर इंजिनिअर म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पैसे उकळल्यानंतर संबंधित तरुणाला भारतीय रेल्वेच्या नावाने बनावट जॉईनिंग लेटर पाठवून विश्वासात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यास परवानगी मिळाली असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कारवाई सुरू झाली आहे.

तक्रारीनुसार, आसलगाव (ता. जळगाव जामोद) येथील आशीष प्रल्हाद जाधव (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांची ओळख ब्रिजमोहन शंकरलाल सराटे (रा. कल्याण, जि. ठाणे) याच्याशी झाली. सराटे याने रेल्वेत ज्युनिअर इंजिनिअर पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत सुरुवातीला ९ लाख रुपये खर्च येईल, त्यापैकी आधी ६ लाख ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

विश्वास बसावा म्हणून आरोपीने रेल्वेतील ओळखींचा हवाला दिला. तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने आरटीजीएस आणि पेटीएमद्वारे ६ लाख ४९ हजार ९९९ रुपये आरोपीकडे पाठविल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर आरोपीने फिर्यादीला सेंट्रल रेल्वे, डीआरएम कार्यालय, पुणे, डीआरएम कार्यालय, मुंबई, तसेच साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे, नागपूर यांच्या नावाने वेगवेगळ्या तारखांचे स्पीड पोस्ट, व्हॉट्सॲप आणि ई-मेलद्वारे जॉईनिंग लेटर पाठविले. मात्र संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ती पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले.

तक्रारीनुसार, फसवणूक उघडकीस आल्यानंतर आरोपीने फिर्यादीला दोन वेळा ४१ हजार ५०० रुपये "सॅलरी" म्हणून पाठवून संशय दूर करण्याचाही प्रयत्न केला. मात्र अखेरीस रेल्वेतील कोणतीही नोकरी मिळाली नाही आणि नियुक्तीपत्रेही बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर अहवाल बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर ३० जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आरोपी ब्रिजमोहन शंकरलाल सराटे याच्याविरुद्ध कलम ३१८(४), ३३६(३) आणि ३४०(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे सरकारी नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या रॅकेटबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. रेल्वे, पोलीस, लष्कर किंवा इतर कोणत्याही सरकारी विभागात पैसे देऊन नोकरी मिळते, अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात असताना ही घटना समोर आली आहे. आरोपीने याच पद्धतीने इतर कोणाची फसवणूक केली आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.