स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई! एकाच दिवशी आठ गुन्हे दाखल, २० आराेपी गजाआड, ८८ लाखांपेक्षा अधिक एवज केला जप्त; पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात मोठी कारवाई!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मोहीम उघडली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (स्थागुशा) पथकाने एकाच दिवशी ८ प्रकरणांमध्ये २० आरोपींना अटक करून तब्बल 88 लाख 32 हजार 305 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुटखा, जुगार, दारू, जीवनावश्यक वस्तूंची काळाबाजारी तसेच चोरीच्या वस्तू विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर अपोअ.श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनील अंबूलकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
14 जुलै रोजी चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल रयतजवळ सापळा रचून ट्रकद्वारे मध्यप्रदेशातून गुटखा आणणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. सईद खाँ रशीद खाँ (रा. देवास, म.प्र.) असे आराेपीचे नाव आहे. त्याच्याकडून ६० लाख ५५ हजार २०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. माेताळ्यात जीवनाश्यक वस्तूचा काळाबाजार करणाऱ्या मंगेश रामभाऊ पारस्कर (वय 25, रा. मोताळा) याच्यावर कारवाई करण्यात आली. माेबाइल लंपास करणाऱ्या दाेघांना पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सहा माेबाईल जप्त करण्यात आले. तसेच अंढेरा, दसरखेड, मलकापूर येथे देशी दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किंमतीची देशी दारु जप्त करण्यात आली. देऊळगाव राजा व मलकापूरात दोन ठिकाणी जुगारावर छापे टाकून ७ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख ४१ हजार २२० रुपयांचा एवज जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशांनुसार व अपर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हाभरात माेहिम सुरू केली आहे.