म्हशींवर क्रूरतेची परिसीमा; बुलढाण्यात तिघांनी म्हशीसोबत चुकीचं केलं! गुन्हा दाखल, २८.५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

 

 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरात जनावरांच्या अमानुष वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला असून, १७ म्हशींना अत्यंत क्रूरपणे भरून नेण्यात येत असलेली आयशर गाडी पोलिसांनी जयस्तंभ चौक परिसरातून ताब्यात घेतली. सदर प्रकरणात तीन आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण २८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई रामकृष्ण मुढे हे १३ जून २०२५ रोजी रात्री गस्त घालत असताना, त्यांना जयस्तंभ चौक येथे जनावरांची गाडी थांबविल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, एका आयशर वाहनात १७ म्हशी अत्यंत दाटीवाटीने आखूड दोरीने बांधलेल्या, गाडी पूर्णतः बंद असल्याने आत हवा व प्रकाशाची कोणतीही सोय नव्हती. त्यातच जनावरांना ना चारा, ना पाण्याची सोय केली होती. या अमानुष अवस्थेत म्हशींना वाहून नेण्यात येत होते. या क्रूरतेमुळे एक म्हैस गंभीर जखमी झाली असून तिचा मृत्यू झाल्याचे नंतर स्पष्ट झाले.
सदर प्रकरणात खालील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
अखिलेश प्रल्हाद विश्वकर्मा (४०, रा. देवास, मध्यप्रदेश – वाहनचालक),शेख आलम शेख बाब(४५, रा. देवास, मध्यप्रदेश – क्लिनर,)शेख ईरफान शेख शफिक (रा. खुडेल बु, इंदोर, मध्यप्रदेश) या तिघांविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत कलम ११(१)(घ), (ङ), (च), (ज), (अ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जप्त मुद्देमालामध्ये १७ म्हशी (अंदाजे किंमत ₹१८,५०,०००) आणि एक आयशर ट्रक (अंदाजे किंमत ₹२०,००,०००) असा एकूण ₹२८,५०,००० चा समावेश आहे. सदर वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, म्हशींना बुलढाणा अर्बन गोशाळा, येळगाव येथे हलविण्यात आले आहे. मृत म्हशीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास एपीआय चापाईतकर करत आहेत. प्रकरण गंभीर असल्याने जनावरांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.