इराण–इजराइलच्या युद्धाचा परिणाम मलकापुरात..! गॅस संपल्याने पेटवली होती चूल.. चुलीचा धूर झाला अन् नंतर राडा– राडा! नेमकं मॅटर जाणून घ्या...
Mar 31, 2026, 10:20 IST
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): इराण इजरायलच्या युद्धामुळे सध्या देशभरात पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगा लावाव्या लागत आहे.. स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर बुक करूनही मिळत नाही, त्यासाठीही रांगा लावाव्या लागत आहे. त्यामुळे रांगेत बऱ्याचदा ग्राहकांची एकमेकांशी "तू–तू–मै –मैं" होऊन वाद होत आहेत. दरम्यान मलकापूर तालुक्यातल्या काळेगाव येथे एका वेगळ्याच कारणावरून राडा झाला.. गॅस संपल्याने चूल पेटवली, त्या चुलीचा धूर (धुपट) निघाल्याने वेगळंच मॅटर झालं.. हे मॅटर डायरेक्ट पोलीस ठाण्यात पोहचलं..
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर तालुक्यातील काळेगाव येथे विजय भाऊराव तायडे (२५) यांच्या घरचा स्वयंपाकाचा गॅस संपल्याने त्यांनी चुल पेटवली होती. दरम्यान तुमच्या चुलीच्या धुराचा आम्हाला त्रास होतोय, चूल बंद करा असे म्हणत आरोपी विजय शंकर दाभाळे, अजय शंकर दाभाळे, अविनाश शंकर दाभाळे आणि सुनिता विजय दाभाळे यांनी तायडे कुटुंबाला शिवीगाळ करत अंगावर वार करून जखमी केले. तक्रारीनुसार विजय तायडे यांच्या आई व पत्नीला लोट–पाट करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.