लग्नानंतरच सुरू झाला छळ... जबरदस्तीने गर्भपात; गोळ्या खाऊन...नवविवाहितेने उघड केला सासरचा धक्कादायक चेहरा!

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतलेल्या संसारातच एका १९ वर्षीय नवविवाहितेच्या वाट्याला अमानुष छळ आल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरात समोर आली आहे. लग्नानंतर काही दिवसांतच पतीसह सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. एवढेच नव्हे, तर गर्भवती असताना जबरदस्तीने गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सालिया अंजूम शेख शहनवाज (वय १९) हिचा विवाह २५ जानेवारी २०२६ रोजी शेख शहनवाज शेख सलीम याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती, सासू फरजानाबी, नणंद शबनमबी आणि शगुफ्ताबी यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेला सतत टोमणे मारणे, अपमानास्पद वागणूक देणे, शिवीगाळ करणे आणि वारंवार मारहाण करणे, असा त्रास सुरू असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे ती गर्भवती असताना जबरदस्तीने गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, १३ एप्रिल २०२६ रोजी मारहाण करून तिला घराबाहेर काढल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर खामगाव शहर पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११५(२), ३(५), ३५१(२), ३५२ आणि ८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जावेद जाफर शेख करीत आहेत. पोलिसांकडून प्रकरणातील सर्व आरोपांची सखोल चौकशी सुरू असून तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.