घरकुल मंजूर झाले नाही म्हणून ग्रामपंचायत शिपायाला मारले! अंजनी खुर्द येथील प्रकार....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): घरकुल मंजूर झाले नाही म्हणून ग्रामपंचायत शिपायाला तिघांनी मिळून जोरदार मारहाण केल्याचा प्रकार मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथे समोर आला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत शिपायाने मेहकर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

 अंजनी खुर्द येथील ग्रामपंचायत मध्ये शंकर मुकिंदा लोखंडे हे शिपाई आहेत. त्यांच्या नात्यातील लक्ष्मण शामराव मुदळकर हे कुटुंबासह अंजनी खुर्द येथेच राहतात. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळण्याकरता मुदळकर यांनी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या नावावर जागा नसल्याने त्यांना घरकुल मंजूर झाले नाही. त्यामुळे शंकर लोखंडे हे ग्रामपंचायत मध्ये कामाला असल्याने तेच त्यांचे घरकुल मंजूर होऊ देत नाही असा मुदळकर यांचा समज झाला. याच रागातून लक्ष्मण मुदळकर, मुलगा सुरेश लक्ष्मण मुदळकर व त्यांचा जावई एकनाथ सानप या तिघांनी शंकर लोखंडे यांना काड्यांनी बेदम मारहाण केली. शंकर लोखंडे यांच्या तक्रारीवरून 
लक्ष्मण मुदळकर, मुलगा सुरेश लक्ष्मण मुदळकर व त्यांचा जावई एकनाथ सानप अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...