विहिरीत पडलेल्या अस्वलाची वन विभागाने शक्कल लढवून केली थरारक सुटका! २८ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; अंबाबरवा अभयारण्यात सुखरूप मुक्त

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात एक थरारक आणि दिलासादायक घटना समोर आली आहे. तारापूर येथे शेतातील विहिरीत पडलेल्या मादी अस्वलाला तब्बल २८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले.
मोताळा वनपरिक्षेत्रातील तारापूर येथील गजानन रबडे यांच्या शेतातील विहिरीत मादी अस्वल पडल्याची घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनचे आदेश दिले.
वन विभागाच्या पथकाने सलग २८ तास मेहनत घेत विविध तांत्रिक उपाययोजना राबवत अखेर ८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अस्वलाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यानंतर अस्वलाला बुलढाण्यातील राणी बागेत हलविण्यात आले. येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेटागळे यांनी तिची प्राथमिक तपासणी केली. तपासणीत मादी अस्वल पूर्णतः सुदृढ असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या मादी अस्वलाला तिच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच अंबाबरवा अभयारण्यात सुखरूप सोडण्यात आले.
ही यशस्वी व कौतुकास्पद कारवाई उपवनसंरक्षक सरोज गवस, वनपरिक्षेत्र अधिकारी पडवळ व पंकज आळसपुरे यांच्या नेतृत्वाखाली संदीप माडवी, बाळासाहेब घुगे, पवन वाघ व त्यांच्या संपूर्ण पथकाने पार पाडली. वन विभागाच्या तत्परतेमुळे एका दुर्मिळ वन्यजीवाचे प्राण वाचल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.