जळक्यांना चांगल दिसल नाही..! रोहडा येथील शेतकऱ्याची तूर आणि सोयाबीन सुडी पेटवली...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीन सुड्या जाळणाऱ्या विकृतांचे प्रमाण वाढले आहे. जळक्या प्रवृत्तीचे लोक असले उपद्व्याप करीत असतात..या जळक्यांना दुसऱ्यांचे चांगले झालेले दिसत नाही आणि स्वतःचे चांगले करण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये नसते. आता चिखली तालुक्यातील रोहड येथे जळक्यांनी एका शेतकऱ्याच्या शेतातील तूर आणि सोयाबीनची सुडी पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तक्रार शेतकऱ्याने अंढेरा पोलीस ठाण्यात दिली आहे..

 रोहडा येथील शेतकरी हरी तुकाराम पंडित (४७) यांची रोहडा शिवारातील गट न ३९३ मध्ये दोन एकर शेती आहे. या शेतात सोयाबीन आणि तुरीची सूडी लावलेली होती. काल सायंकाळी कुणीतरी अज्ञात भामट्याने या सूड्या पेटवून दिल्या. यामुळे सोयाबिनचे ४८ हजार व तुरीचे अंदाजे ७० हजार असे एकूण १ लाख १८ हजार रुपयांची नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...