जळक्याचा कारनामा! दारासमोर उभी दुचाकी जाळून खाक; खामगाव तालुक्यातील गणेशपूरची घटना!

 
खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) : दारासमाेर उभी केलेल्या दुचाकीला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथे ४ ऑगस्ट राेजी घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेशपूर येथील रहिवासी वतन छगनराव मांडवे (वय ४०) यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी ४ ऑगस्ट रोजी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास आपली दुचाकी (एमएच २८ बीएक्स ८४२२) अंदाजे एक लाख रुपये किंमतीची, घरासमोर उभी केली होती. पहाटे चारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दुचाकीला आग लावली. शेजारी राहणारे बाबुलाल रामचंद्र बछिरे यांनी जोरात आवाज देऊन मांडवे यांना माहिती दिली की त्यांची दुचाकी जळत आहे. मांडवे यांची पत्नी बाहेर धावून आली, मात्र तोपर्यंत दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली होती.आपली दुचाकी अज्ञात व्यक्तीने जाळल्याचा संशय वतन मांडवे यांनी व्यक्त केला असून, त्यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विठ्ठल चव्हाण करीत आहेत.