शेतकऱ्याचा संताप उफाळला; आमदार संजय कुटेंच्या बंगल्यात पेट्रोल घेऊन शिरला! म्हणे "बंगला जाळून टाकीन..."
Jun 15, 2025, 09:30 IST
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):“न्याय मिळत नाही म्हणून न्याय मागायला आलो... पण कोणीच ऐकत नाही!” अशा संतप्त भावनेतून बावनबीर (ता. संग्रामपूर) येथील २५ वर्षीय शेतकरी विशाल मुरुख याने गुरुवारी सायंकाळी जळगाव जामोदचे आमदार व माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या बंगल्यात पेट्रोलची कॅन घेऊन धडक दिली आणि "बंगला जाळून टाकीन" अशी धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेच्या वेळी आमदार संजय कुटे निवासस्थानी अनुपस्थित होते, मात्र त्यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश राऊत हे घटनास्थळी होते. त्यांच्या तक्रारीवरून विशाल मुरुख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोहेकॉ संजय वेरूळकर करीत आहेत.
विशाल मुरुख याचा आरोप आहे की, २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्याचे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. कागदपत्रे वेळेवर सादर करूनदेखील तहसील कार्यालयाकडून मदतीची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच्या मनात प्रचंड निराशा व संताप निर्माण झाला होता.
याच निराशेच्या पार्श्वभूमीवर त्याने आमदारांच्या निवासस्थानात जाऊन आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यावेळी परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती आणि पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला ताब्यात घेतले. विशाल मुरुख याचा हेतू स्वतःला जाळण्याचा होता की आमदारांच्या बंगल्याला हानी पोहोचवण्याचा, याचा तपास सुरू आहे.