शेतात शिजवलेलं मटण सांडल अन् तुंबळ राडा झाला! मॅटर पोलिसात गेलं...शेगाव तालुक्यातील घटना

 
 शेगाव(भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतात मित्रांची पार्टी होती.. पार्टी रंगात आली होती.. मटणाची भाजी चुलीवर गदागदा उकळत होती.. उकळणाऱ्या भाजीचा सुवास दरवळत होता...आता भुकेचे कावळे पार्टी करणाऱ्या मित्रांच्या पोटात कावकाव करू लागले...मटणाच्या भाजीवर ताव मारण्याची तयारी सुरू झाली तेवढ्यात गडबड झाली...चुलीत काडी घालतांना भाजी सांडली अन् जाम राडा झाला..ज्याच्या शेतात पार्टी होती त्या मित्राला दोघांनी बेदम केली.. हे मॅटर डायरेक्ट पोलिसांत गेले...
 
    संतोष पुंडलिक बोळे (४०) रा. धनोकार नगर,शेगाव हे १२ मे रोजी संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजताच्या दरम्यान आपल्या मित्रांसोबत त्यांच्या झाडेगाव रोडवरील शेतात मटणाची पार्टी करायला गेले होते. मटणाची भाजी सांडल्याच्या कारणावरून गणेश तांबळे,लल्ला भाकरे दोन्ही रा. धनोकार नगर शेगाव यांनी संतोष बोळे यांना काठीने डोक्यात, कपाळावर मारून जखमी केले.बोळे यांच्या पाठीवर सुद्धा काठीने मारहाण केली. उजव्या हाताच्या पायाच्या गुडघ्यावर मारून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. असे संतोष बोळे यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या आपल्या तक्रारीत म्हटले आहे.