कृषी केंद्रावाल्याचा कारनामा! खत विकले सुपर फॉस्फेट, दाखवले DAP अन् भरपूर काही... ई-पॉस घोटाळ्याचा संशय; मेहकरातील कृषी सेवा केंद्रचालकाविरोधात गुन्हा

 
 मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांच्या नावावर कथित बनावट ई-पॉस नोंदी करून अनुदानित खतांचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कृषी विभागाच्या तक्रारीनंतर संबंधित कृषी केंद्रचालकाविरोधात मेहकर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे शेतकरी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक उद्धव काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उकळी येथील एका शेतकऱ्याने प्रत्यक्षात सहा पोती सिंगल सुपर फॉस्फेट खत खरेदी केले होते. मात्र, शेतकऱ्याच्या आधार-संलग्न मोबाइल क्रमांकावर अधिक प्रमाणात खत खरेदी झाल्याचे संदेश प्राप्त झाले. यामुळे शेतकऱ्याला संशय आला आणि त्याने याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीनंतर कृषी विभागाने संबंधित व्यवहारांची तपासणी केली असता, ई-पॉस प्रणालीतील नोंदी आणि प्रत्यक्ष विक्री व्यवहारांमध्ये तफावत आढळल्याचा दावा करण्यात आला. तसेच डीएपी आणि इतर खतांच्या अतिरिक्त खरेदीचे संदेशही शेतकऱ्यांच्या मोबाइलवर प्राप्त झाल्याचे समोर आले.
या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा भरारी पथकाने संबंधित कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून तपासणी केली. यावेळी विक्री बिले, ई-पॉस प्रणालीतील व्यवहार आणि प्रत्यक्ष खतसाठ्याची पडताळणी करण्यात आली. तपासणीनंतर अनियमिततेचा संशय अधिक बळावल्याने संबंधित केंद्रचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे अनुदानित खत वितरण प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, कृषी विभाग पुढील तपास करीत आहे.