

EXCLUSIVE सिलसिला कायम! बेपत्ता होण्याचे सत्र थांबत नाही; बुलडाणा जिल्ह्यातून ६ दिवसांत २२ लेकी–बाळी गायब; शोधून शोधून आई वडील थकले...
Mar 26, 2025, 16:12 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यात मुली बेपत्ता होण्याचे सत्र थांबताना दिसत नाही. मार्च महिन्यातही हा सिलसिला कायम आहे. जिल्ह्यात अलीकडच्या ६ दिवसांत २२ मुली बेपत्ता झाल्या आहेत. विविध पोलिस ठाण्यात तशी नोंद आहे.
राज्यासह जिल्ह्यात अलीकडच्या काळात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा मुद्दा चर्चेचा ठरला. बुलढाण्यात शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, जयश्रीताई शेळके यांनीदेखील याच मुद्द्यावर गेल्या आठवड्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. बुलडाणा जिल्ह्यात हे प्रमाण आता त्याने वाढलेले आहे. गेल्या वर्षी ८०० पेक्षा अधिक मुली जिल्ह्यातून बेपत्ता झाल्याची नोंद आहे. बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये १८ ते २५ या वयोगटातील प्रमाण लक्षणीय आहे.
कायदा काय सांगतो?
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली किंवा मुले गायब होतात तेव्हा पोलीस गांभीर्याने प्रकरण हाताळतात. अशा प्रकरणात संबंधित अपहरणाचा गंभीर गुन्हा दाखल होऊन पोलिस तातडीने शोध घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र दुसऱ्या बाजूला १८ पेक्षा अधिक वयाच्या मुली कायद्याच्या दृष्टिकोनातून सज्ञान असल्याने पोलिस केवळ बेपत्ता झाल्याची औपचारिक नोंद करतात..केवळ काही संशयास्पद प्रकरणे पोलिस गांभीर्याने हाताळतात...
आई वडिलांची हतबलता...
मुले/ मुली गायब झाल्यावर आईवडील हतबल होतात. सगळीकडे शोधाशोध करण्याचा प्रयत्न होतो, त्यात यश न आल्यास पोलिसांत तक्रार दाखल केली जाते. मात्र मुलगी सज्ञान असल्याने पोलिस आणि पालकांचाही नाईलाज होतो. बहुतांश प्रकरणांत मुली प्रेमविवाहासाठी गायब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रकरणांत कौटुंबिक वाद, अभ्यासात आलेले अपयश आदी कारणेही समोर आली आहेत..