डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच; डोंगरशेवलीच्या ऋतुजा सावळेचा दुचाकी अपघातात मृत्यू; महाविद्यालयात जात असताना घडला अपघात !

बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डॉक्टर बनण्याचे स्वप्न एका युवतीचे अधुरेच राहीले. समोरुन आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने बस खाली सापडल्याने डोंगरशेवलीच्या ऋतुजा सावळेचा १६ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.  
 
ऋतुजा गणेश सावळे ही राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय, बुलढाणा येथे प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. आज १६ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता ती कॉलेजकडे निघाली होती. यावेळी ती दुचाकीने जात होती. अखेर बसच्या बाजूने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने तिला धडक दिली. या धडकेनंतर एका बाजूला जाण्याच्या प्रयत्नात तिचे डोके बसला धडकल्याने ती खाली कोसळली व गंभीर जखमी झाली.

तिला तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण महाविद्यालयात तसेच डोंगरशेवली गावात शोककळा पसरली असून, तिच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ऋतुजा एमबीबीएससाठीही पात्र ठरली होती, अशी माहिती मिळत आहे.