वाहनाने कट मारल्यानेच दाम्पत्याची कार विहिरीत कोसळली; हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजवरून त्या अपघाताचा उलगडा; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल...

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विहिरीत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याच्या अपघाताचे कारण अखेर सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. अज्ञात वाहनचालकाने कारला कट मारल्याने नियंत्रण सुटून दाम्पत्याची कार विहिरीत कोसळल्याचे फुटेज मिळाले असून, या आधारे नांदुरा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव खान्देशातील पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथील पद्मसिंग दामू पाटील (वय ४९) व नम्रता पद्मसिंग पाटील (वय ४५) हे पती-पत्नी तेलंगणा येथून मुळगावी परतत होते. मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडनेर भोलजी शिवारात २७ नोव्हेंबर रोजी त्यांची कार महामार्गालगतच्या विहिरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी नोंदवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली.मोबाइल लोकेशनच्या आधारे परिसरात शोध घेताना वडनेर शिवारातील एका विहिरीत त्यांची कार आढळून आली. पुढील तपासात हॉटेल विश्वगंगा येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, अज्ञात वाहनचालकाने पाटील दाम्पत्याच्या कारला कट मारल्याचे दिसून आले. या कटमुळे पद्मसिंह पाटील यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट विहिरीत जाऊन कोसळली.

सीसीटीव्ही फुटेज आणि संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ तसेच मोटार वाहन कायदा कलम ११९ आणि १३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.