गरिबांच्या घराचे हफ्ते खात होता लाचखोर भामटा! मोताळ्याच्या इंजिनियरला ACB ने रंगेहात पकडले...! तुम्हालाही घरकुलाचा हप्ता पाडून देण्यासाठी कुणी पैसे मागत असेल तर "या" नंबरवर करा कॉल...
Apr 16, 2026, 10:18 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशातल्या प्रत्येकाला घर मिळायला पाहिजे यासाठी केंद्र सरकारकडून घरकुलासाठी विविध योजना सुरू आहेत. त्या योजनेअंतर्गत नागरिकांना घरे बांधण्यासाठी वेगवेगळ्या हफ्त्यात थेट बँक खात्यात पैसे मिळतात.. मात्र या योजनेतही मोठ्या प्रमाणात लाचखोरी सुरू आहे..अगदी ग्रामसेवक, सरपंचापासून तर इंजिनीयर, बीडीओ पर्यंत हप्तेखोरी सुरू आहे. हफ्ता खात्यात टाकून देण्याच्या नावाखाली लाचखोरी केली जाते..मात्र मोताळ्यातल्या एका लाचखोराला चांगलीच अद्दल घडली. घरकुलाचा हप्ता टाकून देण्यासाठी मागितलेली दहा हजाराची लाच स्वीकारताना मोताळा पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.. सचिन शत्रुघ्न इंगळे (३३) असे लाचखोराचे नाव असून तो मूळचा खामगाव तालुक्यातील उमरा गावचा राहणारा आहे.
मोताळा तालुक्यातील एका लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अल्पसंख्यांक घटकातून घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाचा ७० हजार रुपयांचा दुसरा हप्ता प्रलंबित होता. हा हफ्ता मंजूर करून देण्यासाठी लाचखोर इंगळे याने २५००० रुपयांची लाच मागितली होती. यासंबंधीची तक्रार संबंधित व्यक्तीने बुलढाणा येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर काल आरोपीने तडजोडी अंती दहा हजार रुपये स्वीकारण्यास संमती दिली. त्यानंतर पिंपळगाव राजा ते मोताळा रोडवरील फुली फाट्यावर ठरल्याप्रमाणे एसीबीने सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष आरोपी इंगळे याने १० हजार रुपयांची लास्ट स्वीकारली.
त्याचक्षणी साफळा रचून बसलेल्या एसीबीने लाचखोर इंगळेवर झडप घातली. ही कारवाई लाचलुजपत प्रतिबंधक विभाग बुलढाणाचे पोलीस उपाधीक्षक भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार व सापळा पथकातील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. कोणत्याही शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास, घरकुलाच्या हप्त्यांसाठी पैसे मागितल्यास नागरिकांनी अँटीकरप्शन ब्युरो बुलडाणा येथे ०७२६२–२४२५४८, ९४०५०९१०६४ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.