ब्रेक फेल झाल्याने भरधाव कार पुलावरून कोसळली; गुजरातमधील पाच जण जखमी; मलकापूर रस्त्यावरील घटना...
Oct 23, 2025, 10:43 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव कारचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट पुलावरून नाल्यात कोसळली.ही घटना २१ ऑक्टोबर रोजी मलकापूर रस्तावर मोताळा जवळ घडली.
या अपघातात गुजरात मधील पाच जण जखमी झाले. बारडोली शहरातील रहिवासी दिवाळी साजरी करण्यासाठी चिखली येथील नातेवाइकांकडे येत असताना हा अपघात घडला. जीजे ०५ जेआर २१३५ क्रमांकाची इको कार मलकापूरकडून मोताळ्याकडे येत असताना, आयटीआय कॉलेजसमोरील पुलावर अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कारने पुलावरील सुरक्षा कठडे तोडले आणि ती थेट नाल्यात कोसळली.
अपघात इतका भीषण होता की कारचे पुढील चाक आणि बोनेट पूर्णतः चिरडले गेले. घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि १०८ ॲम्बुलन्सद्वारे त्यांना बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
या अपघातात रमाबाई श्याम वानखेडे (४५), निखिल श्याम वानखेडे, संदीप शिरसाट, नेहा श्याम वानखेडे, राहुल पाटील यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांवर सध्या बुलढाण्यात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली.