भरधाव कार टिप्परवर आदळली; महिला ठार, खामगाव चिखली रस्त्यावरील घटना !
Updated: Nov 20, 2025, 14:19 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव टिप्पर अचानक कारच्या समोर आडवा आल्याने कार टिप्परवर आदळली.या अपघातात कारमधील महिला ठार व इतर काही जण जखमी झाले.ही घटना खामगाव - चिखली रोडवरील गारडगाव शेत शिवारात १९ नोव्हेंबर रोजी घडली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनंता रामकृष्ण रसाळ रा. उदयनगर हे मारुती कार क्र. एम. एच. ३० एझेड ७२२७ ने बुधवारी त्यांची आई, पत्नी व वहिनी यांचेसह खामगाव येथून गावी उदयनगरकडे परत येत होते. दरम्यान एका अज्ञात टिप्पर चालकाने त्याचे ताब्यातील टिप्पर अनंता रसाळ यांच्या कारचे समोर अचानक आडवा केल्याने टिप्पर व कारचा अपघात झाला.
या अपघातात वर्षा संतोष रसाळ वय ४० ह्या ठार झाल्या तर इतर जखमी झाले. घटनेची तक्रार शुभम गजानन रसाळ रा. उदयनगर यांनी खामगाव ग्रामीण पोस्टेला दिली. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात टिप्पर चालकाविरुध्द कलम १०६(१), २८१,१२५ (ए) १२५ (बी), ३२४ (४) (५) भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास मपोनीसा यांचे आदेशाने बिट पोहेकॉ भगवान काळबागे यांचेकडे देण्यात आला आहे.
