बोराखेडी पोलीस झोपले! पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर बुलडाणा "एलसीबी" ची धाड...!

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अगदी हाकेच्या अंतरावर चालणारा जुगार अड्डा बोराखेडी पोलिसांना दिसला नाही.. दिसत असला तरी त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले असेल अशी चर्चा आहे..त्याचे कारण असे की दूरवरच्या बुलढाणा एलसीबी ला बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत येऊन पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जुगार अड्ड्यावर कारवाई करावी लागली..त्यामुळे बोराखेडी पोलीस झोपले की काय? असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 25 मे 2026 रोजी जिल्हाभर वरली मटका जुगार अड्ड्यावर कार्यवाही केली यामध्ये मेहकर पोलीस स्टेशन हद्दीत दोन कार्यवाही करण्यात आली तसेच बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत देखील कार्यवाही करण्यात आली. विशेष म्हणजे बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हाके वर असलेल्या मोताळा फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत त्यांच्याकडून 2 हजार 905 रूपांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ. विजय पैठणे, पोना. राकेश नायडू, पोकॉ. निलेश राजपूत यांनी पार पाडली. मग स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना हा जुगार दिसतो तर स्थानिक बोराखेडी पोलिसांना दिसत नाही? की दिसून न दिसल्यासारखे करतात असा प्रश्न निर्माण होतो.
बोरखेडी पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
आणि चोरी करणारे आरोपी ही सर्रासपणे मोकार फिरतात जसा काही चोरट्यांना पोलिसांचा धाकच उरला नाही अशी अवस्था आहे. चोरट्यांचा जाऊद्या पण अवैध धंदे देखील पोलीस स्टेशनच्या काही मीटर अंतरावर सुरू असल्याच चित्र दिसून येते. त्यामुळेच तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना पोलीस स्टेशनच्या काही मीटर अंतरावर येऊन कारवाई करावी लागते...