देऊळघाटमध्ये विहिरीत एकाचा मृतदेह आढळला; परिसरात एकच खळबळ!
Nov 10, 2025, 11:54 IST
देऊळघाट (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथील बसस्थानकाजवळील विहिरीत एकाचा मृतदेह आढळून आल्याने देऊळघाट परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव मोहम्मद शरीफ प्यार मोहम्मद (वय ४९, रा. मलकापूर) असे असून, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
रविवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास बुलढाणा ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली की, बसस्थानकाजवळील पैनगंगा नदीकाठच्या विहिरीत एक अनोळखी मृतदेह दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला असून, मृतक मोहम्मद शरीफ हे देऊळघाट गावचे जवाई असून काही दिवसांपासून ते येथे वास्तव्यास होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलिस करीत आहेत.
