

दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी! दुसरी दुचाकी येऊन धडकली! दोन तरुणांचा मृत्यु, १ गंभीर! लोणार तालुक्यातील घटना ! दोघेही एकुलते एक होते.....
Apr 21, 2025, 11:54 IST
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दुचाकी अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला आहे. ही घटना लोणार तालुक्यातील येवती येथील सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलसमोर घडली. शुभम ज्ञानेश्वर सोनुने (वय १९) व अनिल पांडुरंग गायकवाड (वय २०) अशी मृतकांची तर गणेश शेषराव गायकवाड असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
Advt
शुभम ज्ञानेश्वर सोनुने (वय १९) हा रस्त्याच्या कडेला दुचाकी क्रमांक एमएच-२८-ए-४४८६ ऊभी करून गाडीवर बसला होता. दरम्यान, येवती येथून काही कामानिमित्त निघालेले अनिल पांडुरंग गायकवाड (वय २०) व गणेश शेषराव गायकवाड यांची दुचाकी क्रमांक एमएच-२८-एयु-६५९७ उभ्या दुचाकीला जोरदार धडकली. या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्याने अनिल गायकवाड यांचा रूग्णालयात घेवून जात असताना मृत्यू झाला. तर शुभम सोनुने याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला. गणेश गायकवाड हा जखमी असून त्याच्यावर उपचार
सुरू आहे.
मृत झालेले अनिल आणि शुभम हे दोघेही ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होते आणि चांगले मित्र होते. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून शुभम सोनुने याच्या वडीलांनी सात-आठ महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली आहे. तर अनिल गायकवाड यांच्या वडिलांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे. दोघेही घरातील एकुलते एक होते. या अपघाताने गावात शोककळा पसरली असून अशी दुर्दैवी घटना गावात प्रथमच घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.