

भामट्यांना नाही राहिला धाक; धावत्या दुचाकीवरून ओढले मंगळसूत्र; पती –पत्नी मोटर सायकल वरून पडले! मोताळा येथील घटना..
Mar 26, 2025, 08:52 IST
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धावत्या दुचाकीवरून दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि मोबाइल हिसकावून नेल्याची घटना मोताळा शहरात घडली. मोताळा-नांदुरा मार्गावरील सर्वेश्वर नगर पाटीजवळ घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेमुळे पोलिसांचा धाक राहिला की नाही अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे..
स्वाती ज्ञानेश्वर सोळंके (रा. टाकरखेड, ता. नांदुरा) यांनी व त्यांचे पती ज्ञानेश्वर सोळंके हे दुचाकीने घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर येत असलेल्या दोन अज्ञातांनी अचानक स्वाती यांच्या गळ्यातील सोन्याचे ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र, ज्ञानेश्वर यांचा दहा हजार रुपयांचा मोबाइल, असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला. घटनेदरम्यान पती-पत्नीला दुचाकीवरून जोरात ओढल्याने ते रस्त्यावर पडून जखमी झाले. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.