मलकापूर बलात्कार प्रकरणातील आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करणार! शेतातील घरात घुसून दाम्पत्याला लुटले, महिलेवर अत्याचार करण्याचे प्रकरण!
१७ जुलैच्या रात्री दुयाळगाव शिवार हादरले होते! शेतातील घरात रात्री सुमारे ११ वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी दरवाजा तोडून प्रवेश केला. पतीला चाकूचा धाक दाखवत आरोपींनी मोबाईल आणि रोख रक्कम लुटली. त्यानंतर महिला आणि तिच्या पतीला शेतात नेण्यात आले. पतीला विळ्याचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर १८ जुलै रोजी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान होते. प्रत्यक्ष पुरावा आणि आरोपींची स्पष्ट ओळख नसल्याने तपासाला अनेक अडचणी येत होत्या. मात्र, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची कास सोडली नाही. पाच पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. साक्षीदारांकडून माहिती घेण्यात आली. संशयितांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि डीएनए नमुन्यांची सांगड घालत तपास पुढे नेण्यात आला.
एक-दोन दिवस नव्हे, तर तब्बल ४० दिवसांहून अधिक काळ पोलिसांची तपासाची चक्रे सुरू होती. अखेर या तपासातून आरोपींची ओळख पटली.
मध्य प्रदेशात धागा मिळाला अन् रात्रीच पोलिसांची धडक!
तपासादरम्यान आरोपी मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दापोरा (शहापूर), जिल्हा बुरहानपूर येथे कारवाई केली. २६ ऑगस्टच्या रात्री सुमारे १ वाजता दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
राकेश महेंद्रसिंग भिल्लाला (२२) आणि जामसिंग रेशन भिल्लाला (२२), दोघेही रा. जामठी, ता. जि. बुरहानपूर, मध्य प्रदेश, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून फिर्यादीच्या पतीचा चोरीस गेलेला मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली होती. ही कोठडी २९ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.या प्रकरणात आरोपींची ओळख समोर येत नसल्याने तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान होते. मात्र, सीसीटीव्ही, तांत्रिक माहिती, साक्षीदारांकडून मिळालेली माहिती आणि डीएनए तपास अशा विविध धाग्यांची सांगड घालत पोलिसांनी आरोपींचा माग काढला. महिना-दीड महिन्याच्या अथक तपासानंतर दोघांना मध्य प्रदेशातून पकडण्यात आले, ही या तपासातील महत्त्वाची बाब ठरली.गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा तपास लावत आरोपींना न्यायालयापर्यंत पोहोचविल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे.