२५ वर्षीय तरुणाने टोकाचा निर्णय घेऊन जीवन संपवले; कारण धक्कादायक..! महिलेने दिली होती धमकी...
Jul 21, 2025, 08:41 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :महिलेने पैशासाठी वारंवार धमकी दिल्यामुळे एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश जयराम कळसकार वय (५७) रा.वाडी, खामगाव दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा मंगेश प्रकाश कळसकार वय (२५) यास शेजारी राहणारी नलिनी वंडाळे वय (४२) जात बारी हिने बदनामी केल्याच्या कारणावरून सतत मंगेश ला धमकावले. तिने छेडछाड केली अशी तक्रार करण्याची धमकी देत एक ते दीड लाख रुपये देण्याची मागणी मंगेश कडे केली.
पैसे न दिल्यास तक्रार करून अडचणीत आणण्याची धमकी ती वारंवार देत होती. या मानसिक त्रासाला कंटाळून मंगेश याने जळगाव जामोद हद्दीतील पूर्णा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. ही बाब १९ जुलै रोजी उघडकीस आली. मंगेश याच्या वडिलांच्या तक्रारी वरून महिलेविरुद्ध खामगाव शहर पोलिस ठाण्यात कलम १०८, ३५१ (२), ३०८(२) सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (२) (व्ही) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.