भूखंडाचा हप्ता भरण्यासाठी काढलेले १ लाख ८० हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीतून लंपास! देऊळगाव राजा येशील घटना...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण साहेबराव शेळके (वय ३३, रा. सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा) यांनी भूखंडाचा हप्ता भरण्यासाठी देऊळगाव राजा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून १ लाख ८० हजार रुपये काढले होते. ही संपूर्ण रक्कम त्यांनी केसरी रंगाच्या थैलीत ठेवून दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर चिखली रस्त्यावरील राष्ट्रसंत प्लाझासमोर त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करण्यासाठी जवळच्या दुकानात गेले.
काही वेळाने दुकानातून परत आल्यानंतर त्यांना दुचाकीची डिक्की उघडी असल्याचे दिसले. डिक्कीत ठेवलेली रोकड असलेली थैली गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्काच बसला. या थैलीत १ लाख ८० हजार रुपयांच्या रोकडसह स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि एचडीएफसी बँकेची पासबुकही होती.
याप्रकरणी शेळके यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी सोमवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक गिरी आणि पोलीस उपनिरीक्षक मांटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत.