रोह्याने धडक दिल्याने झाला भरोसा – देऊळगाव घुबे मार्गावर "त्या" दुचाकीस्वाराचा मृत्यू....

 
 देऊळगाव घुबे (ऋषि भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अज्ञात कारणामुळे देऊळगाव घुबे - भरोसा मार्गावर संध्याकाळी उशिरा अपघात होवून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १७ डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. दरम्यान याप्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून, रोह्याच्या भीषण धडकेमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे..

 पवन सुनील ठाकूर (३५ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. ते चिखली शहरातील हरी ओम नगरातील रहिवासी होते. गुरुवारी सायंकाळी देऊळगाव घुबे - भरोसा मार्गाने जात असताना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रोहिने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये, त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत होवून दुर्दैवाने ते जागीच गतप्राण झाले. मात्र निर्जन, रस्त्यावरील झालेल्या या अपघाताचे कारण त्यावेळी कळू शकले नव्हते. पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून तपास केला. यानंतर, मृतक पवन ठाकूर यांचे कुटुंबीय शरद ठाकूर यांनी पोलिसांना कळविले की, रोहीच्या धडकीने हा अपघात झाला. यावरून अंढेरा पोलिसांनी पवन ठाकूर यांच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास उगले हे करीत आहेत.