समृद्धीवर भीषण ! उभ्या ट्रकला कारची मागून धडक... एकाचा जागीच मृत्यू.... डोणगाव जवळ घडली घटना

 
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे उभ्या वाहनाला मागून धडक देऊन अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. समृद्धीवर वाहन उभे करण्यास मनाई असताना देखील अनेक वाहन चालकांकडून या नियमाचा भंग होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान काल समृद्धी महामार्गावर उभ्या करण्यात आलेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील इतर नातेवाईक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दिनांक ७ जून रोजी मध्यरात्री १२.१५ सुमारास वाजण्याच्या आंध्रुड शिवारातील चॅनल क्रमांक २७३.०२ जवळ घडली. अपघातात कृष्णा संगीत राठोड (वय २६) (रा. सोमनाथनगर, ता.मानोरा, जि. वाशिम) या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.
 डोणगाव
हेमंत अर्जुन चव्हाण (वय ३८, रा. मोख, ता. दिग्रस, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या नातेवाईकांचा प्रवास (क्र. एमएच-२९- बीपी-५५४३) या कारमधून समृद्धी महामार्गावर सुरू होता. दरम्यान, आंध्रुड शिवारातील चॅनल क्रमांक २७३.०२ जवळ ट्रक (क्र. एमएच-१५-बीजे-७६६५) चालकाने महामार्गावर वाहन उभे केले होते. 
महामार्गावर पार्किंगला परवानगी नसतानाही ट्रक रस्त्यावर उभा करण्यात आला होता, तसेच रात्रीच्या वेळी वाहनाची ओळख पटावी, यासाठी कोणतेही इंडिकेटर सुरू ठेवले नव्हते किंवा आवश्यक परावर्तित चिन्हेही लावण्यात आली नव्हती. काळोखामुळे रस्त्यावर उभा असलेला ट्रक चालकाच्या निदर्शनास न आल्याने कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात कृष्णा संगीत राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर नातेवाईक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणात पोलिसांनी ई-साक्ष नोंदवून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.