भीषण आग! राधे कोल्ड्रिंक्स दुकान जळून खाक – पहाटेचे स्फोट, लाखोंचे नुकसान
May 12, 2025, 15:44 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या राधे कोल्ड्रिंक्स दुकानात १२ मे रोजी पहाटे पाच वाजता भीषण आग लागली. काही क्षणांतच संपूर्ण दुकान आगीत होरपळून खाक झाले आणि लाखोंचे नुकसान झाले.
हे दुकान थेट पोलीस स्टेशनला लागून असल्याने पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाला सूचना दिली. मात्र, स्थानिक टँकरमध्ये पाण्याचा तुटवडा असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात वेळ लागला.
यानंतर शेगाव येथून अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर, सकाळी सात वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीदरम्यान दोन ते तीन वेळा स्फोटही झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पहाटेची वेळ आणि वाऱ्याचा अभाव यामुळे आगीचा प्रसार इतर भागांमध्ये झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली.