24 तासांत मंदिर चोरीचा पर्दाफाश; मुद्देमालासह आरोपी जेरबंद...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरातील कन्हाळे ले-आऊट परिसरातील सिद्धेश्वर महादेव मंदिरातील चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे. आरोपीकडून चोरीला गेलेला १८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून दानपेटीतील रोख रक्कम तसेच मंदिरातील चांदीच्या वस्तू असा एकूण १८ हजार ५५० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यामध्ये दोन चांदीचे जलाधार, पितळी जलाधार, चांदीचा नंदी दीप, चांदीचे देवाचे डोळे व इतर धार्मिक साहित्याचा समावेश होता. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आकाश शिवरतन बाहेती (वय ५०, रा. कन्हाळे ले-आऊट बुलढाणा) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मंदिरातील चोरीची कबुली दिली. आरोपीकडून चोरीला गेलेला १८ हजार ५५० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपीला बुलढाणा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक, अमोल गायकवाड. अपर पोलीस अधीक्षक (खामगाव) पीयुष जगताप, पोलीस निरीक्षक आशिष रोही, सपोनि सुनिल इंगळे, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, चाँद शेख यांनी पार पाडली.