अचानक लाईट आली... देऊळगाव महीत विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू!

 
देऊळगाव मही (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरातील वीज होल्डरमध्ये वायर बसविताना विजेचा जोरदार धक्का बसून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३० मार्च रोजी सायंकाळी येथे घडली. गणेश आश्रुबा बनसोडे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बनसोडे हे रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ३० मार्च रोजी दिवसभर काम आटोपून ते सायंकाळी घरी परतले. घरातील वीज होल्डरमध्ये वायर बसविण्याचे काम सुरू असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. काही क्षणांतच वीजपुरवठा पुन्हा सुरू झाल्याने त्यांच्या हाताचा संपर्क उघड्या तारेशी आला आणि त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, बनसोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.