सोनाळा गावात मध्यरात्री तुफान हाणामारी! एकाच समाजातील दोन गटांत संघर्ष; १५ आरोपींवर गुन्हा, सहा जण गंभीर जखमी...

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :तालुक्यातील सोनाळा गावात बुधवारी मध्यरात्री एकाच समाजातील दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गटांच्या परस्पर तक्रारींवरून १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेच्या वेळी नवल सोळंके हे आपल्या नातेवाइकांसोबत बोलत असताना परमेश्वर चव्हाण तेथे आला आणि क्षुल्लक कारणावरून वाद घालू लागला. यावरून दोघांमध्ये वाद वाढला. मध्यस्थी करण्यासाठी सागर सोळंके घटनास्थळी आला असता, परमेश्वर चव्हाणने सागरच्या डोक्यात फावड्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर गैरकायद्याची मंडळी जमवून नवल सोळंके व त्याच्या नातेवाइकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी नवल सोळंके यांच्या फिर्यादीवरून परमेश्वर किसन चव्हाण, देवानंद किसन चव्हाण, ईश्वर किसन चव्हाण, किसन ज्योतीराम चव्हाण, गोरख ज्योतीराम चव्हाण, इंद्राबाई भगवान शिंदे, फुलाबाई शंकर शिंदे या सात जणांविरुद्ध सोनाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, देवानंद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नवल नारायण सोळंके, धनाजी नारायण सोळंके, साजन धनाजी सोळंके, सुनील साहेबराव सोळंके, राजू साहेबराव सोळंके, संजू साहेबराव सोळंके, राहुल नवल सोळंके, चंद्रकला अवचित चव्हाण या आठ जणांविरुद्ध प्रत्युत्तरात्मक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 जखमींवर उपचार सुरू
या हाणामारीत जखमी झालेल्या नागरिकांवर शेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, सोनाळा पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपास करत आहे.