खामगावात घरावर दगडफेक; तरुणी जखमी, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन:संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल...

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणीच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकारात तरुणी जखमी झाली आहे. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली.
 

प्राप्त माहितीनुसार, फरशी भागातील भुसारा गल्ली येथे राहणारी भूमिका राजेश जोशी (वय २०) ही तरुणी घराबाहेर उभी असताना अज्ञात व्यक्तीने तिच्या दिशेने दगड फेकला. दगड खांद्यावर लागल्याने ती जखमी झाली असून तिला तत्काळ वैद्यकीय उपचार देण्यात आले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मागील दोन-तीन दिवसांपासून त्यांच्या घराच्या दिशेने वारंवार दगडफेक होत होती. या प्रकरणात बोरीपुरा परिसरातील अत्ता पठाण याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गुन्हा नोंदवून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १२५(अ) अंतर्गत पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या घटनेला काही समाजकंटकांकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. सोशल मीडियावर दोन समाजांमध्ये वाद झाल्याच्या अफवा पसरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी हा प्रकार पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडल्याचे स्पष्ट करत कोणताही धार्मिक संबंध नसल्याचे सांगितले.

पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून संशयास्पद माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधण्यास सांगितले आहे. सायबर सेल सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवून असून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.