उभा गहू जळाला; स्वप्नांची राखरांगोळी झाली; कोनड खुर्द व शेळगाव आटोळ येथील घटना! महावितरणच्या तारांचे शॉट सर्किट झाल्याने नुकसान! भरपाईची मागणी...
Mar 11, 2026, 13:48 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अगदी हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडातून हिसकावल्या गेलाय..पुढच्या दोन चार दिवसांत घरात नवीन गहू येणार होता, वर्षभराची कुटुंबाची सोय होणार होती..त्यासाठीच तर गेल्या ४ महिन्यांपासून शेतात पेरलेल्या त्या गव्हाची दररोज निगा राखल्या जात होती, लोड शेंडिंगच्या समस्येमुळे कडाक्याच्या थंडीत रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जावे लागत होते..कष्टातून फुललेलं हे स्वप्न मात्र आता केवळ स्वप्नच राहणार आहे.. कोनड खुर्द आणि शेळगाव आटोळ येथील शेतकऱ्यांचे दोन वेगवेगळ्या घटनेत उभे गव्हाचे पीक जळून झाले आहे. शेतातून गेलेल्या महावितरणच्या तारांचे शॉर्टसर्किट झाले, आणि उभा वाळलेला गहू जळून खाक झाला..आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी जनभावना आहे.
कोनड खुर्द येथील अशा प्रवीण पंडित यांचे येवता शिवारात गट नंबर ३१६ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी गहू पेरला होता, पुढच्या दोन तीन दिवसांत गव्हाची काढणी होणार होती..मात्र शेतातून गेलेल्या महावितरणच्या तारांचे शॉर्टसर्किट झाल्याने एक एकर उभा गहू जळून खाक झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतचा पंचनामा केला असला तरी नेमकी मदत कधी मिळणार? किती मिळणार?
हा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. दुसरी घटना शेळगाव आटोळ येथे घडली.
सुनील रमेश सुरडकर आणि अंकुश रमेश सुरडकर यांचे शेळगाव आटोळ शिवारातील गट क्रमांक १३४ मधील शेतातील उभा गहू शॉर्टसर्किटमुळे खाक झाला. या शेतात ठेवलेले स्प्रिंकलरचे पाईपही जळून खाक झाले. दोन्ही घटनांमधील शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी समाजमनातून समोर येत आहे.