बेरोगाव फाट्याजवळ एसटी बस-टिप्परची समोरासमोर धडक; भीषण अपघातात चालक ठार, केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी नागरिकांची शर्थीची धडपड

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली-खामगाव मार्गावर बेरोगाव फाट्याजवळ एसटी बस आणि टिप्परची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट) सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेत टिप्पर चालकाचा मृत्यू झाला, तर बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. धडकेनंतर टिप्परच्या केबिनचा चक्काचूर झाल्याने चालक त्यात अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी शर्थ केली.

प्राथमिक माहितीनुसार, एमएच १४ एमटी १२८ क्रमांकाची एसटी बस छत्रपती संभाजीनगर येथून देऊळगाव राजा, जालना, चिखलीमार्गे खामगावकडे जात होती. याचवेळी बेरोगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एमएच २८ एबी ८२८ क्रमांकाच्या टिप्परची बसला जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की टिप्परच्या केबिनचा मोठा भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाला.


या अपघातात टिप्पर चालक सचिन वाघ (रा. छत्रपती संभाजीनगर, चिखली) हा केबिनमध्ये अडकला. गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. टिप्पर बालाजी जाधव (रा. हातणी) यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे.

केबिनमध्ये अडकला चालक; नागरिकांची शर्थीची धडपड

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टिप्परच्या केबिनमध्ये चालक अडकून पडल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी नागरिक आणि आपत्कालीन यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन व पोलिस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली.दरम्यान, अपघातात एसटी बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एसटी बस आणि टिप्परची धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाहनांची स्थिती, रस्त्यावरील परिस्थिती तसेच प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अपघाताचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेमुळे चिखली-खामगाव मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघात नेमका कसा घडला आणि त्याला जबाबदार कोण, याचा तपास सुरू आहे.