एसटी बसची पादचाऱ्याला जोरदार धडक; विजय फसले गंभीर जखमी! मोताळ्याच्या त्रिमूर्ती पेट्रोल पंपाजवळ रात्रीची घटना...
Jun 21, 2025, 12:54 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा-मोताळा मार्गावर बुधवार, १९ जून रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास एसटी बसने पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात विजय फसले (रा. येळगाव, ता. बुलढाणा) हे गंभीर जखमी झाले आहेत.
विजय फसले हे रात्री पायी प्रवास करत असताना, बुलढाण्याकडून मोताळाकडे भरधाव येणाऱ्या बुलढाणा आगाराच्या (एमएच १४ बीटी ४७५२) क्रमांकाच्या एसटी बसने त्यांना त्रिमूर्ती पेट्रोल पंपाजवळील एका हॉटेलसमोरील रस्त्यावर जोरदार धडक दिली. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी तत्काळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमी विजय फसले यांना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.
या अपघाताबाबत पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत.