भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; युवक गंभीर जखमी; अपघातानंतर चालक पसार; अज्ञात मुलीच्या फोनमुळे कुटुंबीयांना मिळाली अपघाताची माहिती...
अज्ञात मुलीचा फोन… अन् वाचला एक जीव
अपघातानंतर रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या राहुलच्या मोबाईलवरून एका अज्ञात मुलीने धैर्य दाखवत कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. हा फोन त्या कुटुंबासाठी देवदूत ठरला. माहिती मिळताच राहुलची बहीण अश्विनी विरशीद, आई चंद्रभागा, वडील नंदकिशोर विरशीद व शेजारी प्रशांत हिवाळे तातडीने घटनास्थळी धावले.
स्थानिकांच्या मदतीने राहुलला प्रथम शासकीय रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या उपचार सुरू आहेत.
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी राहुलची बहीण अश्विनी विरशीद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (आर.जे. १४ जी.टी. ३४३५) क्रमांकाच्या ट्रकचालकाविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
रस्त्यावर अपघात झाला की माणुसकीही पळ काढते का?
हा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे समोर आला आहे. वेळेवर मदत मिळाली नसती तर कदाचित आज एक तरुण आयुष्याशी झुंज देत नसता… हेच या अपघाताचे विदारक वास्तव आहे.
