जावयाची दादागिरी! सासूबाईंवर केले कुऱ्हाडीने वार;खामगाव तालुक्यातील मांडका येथील थरार....
May 2, 2025, 10:43 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील मांडका येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.४९८ म्हणजेच कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल असलेल्या जावयाने सासुरवाडीत जाऊन सासूवर कुऱ्हाडीने वार केले . या हल्ल्यात सासूबाई गंभीर झाल्या आहेत. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडका येथील संध्या बोबटकार (४५) यांच्या मुलीचे लग्न ३ वर्षा आधी गावातीलच गोपाल पांडुरंग बोचरे याच्यासोबत झाले होते. त्यांच्या मुलीला २ वर्षांचा अभिनंदन नावाचा मुलगा आहे. मात्र जावई गोपाल बोचरे हा त्याच्या बायकोला नेहमी मारहाण करतो, नीट वागवत नाही.त्यामुळे गोपाल बोचरे विरोधात २९ एप्रिल रोजी पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. संध्या बोबटकर यांची मुलगी सध्या माहेरीच राहते. दरम्यान घटनेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता तक्रारदार संध्या बोबटकार घराबाहेर भांडे घासत होत्या. त्यावेळी जावई गोपाल बोचरे तिथे कुऱ्हाड घेऊन आला.
मला माझा मुलगा अभिनंदन दे असे जावई सासूबाईंना म्हणाला. त्यावर मुलगा कोर्टातून घे असे सासूबाई त्याला म्हणाल्या असता जावई गोपाल बोचरे यांनी शिवीगाळ करून हातातील कुऱ्हाडीने सासूबाईंच्या डोक्यावर वार केला. सासुबाई जखमी झाल्याचे कळताच तो पळून गेला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. तक्रारीवरून गोपाल बोचरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.