सोशल मीडिया रिल स्टारचे फेक अकाउंट तयार करून आक्षेपार्ह पोस्ट; भुसावळच्या युवकाविरुद्ध गुन्हा; बुलढाणा सायबर पाेलिसांनी केला यशस्वी तपास..!

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सोशल मीडियावरील प्रसिद्ध रिल स्टार महिलेचे फेक फेसबुक अकाउंट तयार करून महापुरुषांबद्दल बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची घटना समाेर आली. या प्रकरणी बुलढाणा सायबर पाेलिसांनी तपास करून भुसावळच्या युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. निलेश सुनिल सोनार (वय 26, रा. भुसावळ, जि. जळगाव) असे आराेपीचे नाव आहे.  
दि. 27 जून 2025 रोजी अज्ञात आरोपीने बुलडाणा जिल्ह्यातील एंजेलीना (नाव बदललेले) वय २८ वर्ष या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे (जिचे आठ लाख फॉलोअर्स आहेत) फेक फेसबुक अकाउंट तयार केले. या अकाउंटवर महापुरुषांविषयी बदनामीकारक व धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केली. या पोस्टमुळे नेटिझन्समध्ये संताप व्यक्त झाला व त्या रिल स्टारवर टीकेची झोड उठली. या प्रकरणी पीडित महिलेने तात्काळ सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा येथे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध कलम 299 BNS सह कलम 66(C) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. त्याचबरोबर सायबर पोलीसांनी त्वरीत कारवाई करून आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकली.
सायबर पोलीसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. फेक अकाउंट तयार करून पोस्ट करणारा आरोपी निलेश सुनिल सोनार (वय 26, रा. भुसावळ, जि. जळगाव) हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सदगिर, पोहेकॉ कुणाल चव्हाण, पोकॉ संदीप राऊत आणि विक्की खरात यांनी केली.