बोदेगावमध्ये सामाजिक बहिष्काराचा काळा डाग; एका कुटुंबाला अमानवी वागणूक, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल...

 
 धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना बुलढाणा तालुक्यातील बोदेगाव येथे उघडकीस आली आहे. गावातील एका कुटुंबाला धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांतून वाळीत टाकत त्यांच्यावर थेट सामाजिक बहिष्कार लादण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी बुलढाणा न्यायालयाच्या आदेशान्वये धाड पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बोदेगाव (ता. बुलढाणा) येथील रहिवासी भाऊसाहेब पंडितराव दांडगे (वय ५६) व त्यांच्या कुटुंबाला गावात किराणा सामान मिळू न देणे, सार्वजनिक सेवा वापरण्यास मज्जाव करणे, तसेच त्यांच्या शेतात कोणत्याही मजुराने काम करू नये असा सामाजिक फतवा काढण्यात आल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता दांडगे कुटुंबाला धार्मिक तसेच खासगी कार्यक्रमांतून वगळण्याच्या अटी लादण्यात आल्या आणि त्यांच्या नावाने गावात बदनामीकारक फलक लावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या अमानवी वागणुकीविरोधात भाऊसाहेब दांडगे यांनी बुलढाणा न्यायालयात धाव घेतली होती. प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने संबंधित सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश धाड पोलिसांना दिले. त्यानुसार राजेंद्र बाबुराव उबाळे (४२), अमोल माणिकराव उबाळे (३५), कैलास शेनफड उबाळे (३८), रामेश्वर देविदास उबाळे (३४), शीतल नरेंद्र उबाळे (४२), किरण रावसाहेब लहाने (३७) आणि रावसाहेब नायबराव लहाने (६८), सर्व रा. बोदेगाव, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाड पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम २०१६ मधील कलम ३, ४, ५, ६ व ७ तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम १९०, ६१ (१), ६१ (२), ३५६ (१), ३५६ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे करीत आहेत.
समाजात अद्यापही सामाजिक बहिष्कारासारख्या अमानवी प्रथा अस्तित्वात असल्याचे हे प्रकरण गंभीर वास्तव समोर आणते. कायद्याने अशा कृत्यांना स्पष्ट मनाई केली असतानाही घडलेली ही घटना समाजप्रबोधनाची आणि कठोर कारवाईची गरज अधोरेखित करणारी ठरत आहे.