एवढी हिंमत! मोटारसायकल वरून नेत होते गांजा; LCB ने दाबल्या नाड्या! बीबी येथे मोठी कारवाई.....

 
 बिबी(श्रीकृष्ण पंधे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):दुचाकीवरुन गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले. आरोपींच्या ताब्यातून १ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या गांजासह तब्बल २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात, पोलि अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मातोंडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज १६ जानेवारी रोजी बिबी पोलीस स्टेशन हद्दित ही कारवाई केली.

झटपट श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगार नानाविविध क्लृप्त्या लढवित असून गांजा तस्करीसारख्या व्यवसार्याकडे देखील वळले आहेत. तर कोणी चक्क गाजांची शेती पीकवत असल्याचे बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या काळात जळगाव जामोद पोलीस स्टेशन व देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दित केलेल्या धडाकेबाज कारवायांवरुन समोर आले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सदर बाब गांभीर्याने घेत जिल्ह्यात गांजाची
 तस्करी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना दिले होते. त्याअनुषंगाने पोनि लांडे यांनी त्यांच्या अधीनस्त असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर, पोलीस अंमलदार चांद शेख, युवराज राठोड, विजय सोनोने, गोपाल तारुळकर, ऋषिकेश थुट्टे, महिला पोलीस अंमलदार आशा मोरे, तांत्रिक विश्लेषक राजू आडवे, चालक पोलीस अंमलदार राहुल बोर्डे यांच्या पथकाला गांजा तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा सुचना केल्या होत्या.
दरम्यान, आज १६ जानेवारी रोजी उपरोक्त पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बिबी पोलीस स्टेशन हद्दित येणाऱ्या देऊळगाव कोळ शिवारात नायब तहसीलदर रामप्रसाद डोळे, ठाणेदार निमिष मेहेत्रे यांना सोबत घेऊन नाकाबंदी केली. त्यावेळी एमएच-२८-बीपी-८३८७
क्रमांकाच्या दुचाकीवर ट्रीपलसीट स्वार होऊन येणाऱ्या आरोपी शेख इस्माईल शेख मोहंमद (रा. खामगाव), जावेद खान हामिद खान (रा. सुलतानपूर) व शहबाज खान ऐजाज खान (रा. खामगाव) यांना थांबवून त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातील एका गाठोड्यात १० किलो ३०० ग्रॅम गांजा (किंमत १ लाख ५४ हजार ५०० रुपये), एक मोटारसायकल (किंमत ५० हजार रुपये), दोन नग मोबाइल (किंमत १० हजार रुपये), एकुन २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पथकाने उपरोक्त मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरुध्द बिबी पोलिसांत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास बिबी पोलीस करीत आहे.