तर तुझा मस्साजोगच्या सरपंचासारखा गेम करू! कळंबेश्वरच्या सरपंच पतींना धमकी; तिघांनी गळा आवळला अन्....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड गाजत आहे. या प्रकरणात संशयित असलेल्या वाल्मीक कराड यांनी सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे, दरम्यान या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर ग्रामपंचायत च्या सरपंचपतींसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. कळंबेश्वरच्या सरपंच पतींचा तिघांनी गळा आवळला. खिशातील नगदे पैसे व सोन्याचे दागिने मिळून १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हिसकावला, तू आमच्या अवैध धंद्यांना विरोध करशील तर तुझा दुसरा मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख करून टाकील अशी धमकीही दिली. या प्रकाराने सध्या खळबळ उडाली असून सरपंच पती सुभाष मनोहर खुरद यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

प्राप्ती माहितीनुसार सरपंच पती सुभाष खरद हे गावातील अवैध धंदे बंद होण्यासाठी प्रयत्न करत होते. यामुळे अवैध धंदे करणारे गणेश शंकर भराड (४२) व आकाश गोविंद सपकाळ (३०) दोघे चिडलेले होते.३१ डिसेंबर रोजी सरपंच पती सुभाष खुरद गावातीलच एका महिलेच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेले होते, स्मशानभूमीतून बाहेर येत असताना आरोपी गणेश भराड व आकाश सपकाळ यांच्यासह एका अज्ञात आरोपीने सरपंच पतींचा गळा आवळला. खिशातील नगदी २५ हजार , बोटातील सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, गळ्यातील सोन्याचा गोफ असा एकूण १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जबरीने हिसकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी आरोपी शंकर भराड याने " तू माझ्या अवैध धंद्यांना विरोध करशील तर तुझा मस्साजोगच्या सरपंचासारखा गेम करून टाकीन" अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीं विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत...