झोपेत सर्पदंश… पातुर्डा येथील युवकाचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला!
Jul 21, 2025, 14:49 IST
पातुर्डा बु (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : "आई-बाबा, काहीतरी झालंय...!" या हाकेनं घरातल्या प्रत्येकाची झोप उडाली, पण त्यानंतर जे घडलं त्याने डिगे कुटुंबाला आयुष्यभराचं दुःख दिलं. पातुर्डा येथील वार्ड क्र. २ मध्ये राहणाऱ्या अमोल अजाबराव डिगे (वय २७) या युवकाचा विषारी सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
अल्पभूधारक कुटुंबातील अमोल दिवसभर शेतीच्या कामात गुंतलेला हाेता. त्या रात्रीसुद्धा कुटुंबाने दिवसभराचा शीण विसरून जेवण केले आणि सगळे झोपी गेले. झोपेत असताना अमाेलला एका विषारी सापाने दंश केला. त्याने प्रसंगावधान राखून सापाला पकडून भिंतीवर फेकले. पण विष मात्र त्याच्या शरीरात पसरत गेले.
शेजाऱ्यांच्या मदतीने साप पकडून एका डब्यात ठेवण्यात आला, जेणेकरून डॉक्टरांना ते ओळखून योग्य उपचार करता येतील. अमोलला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. चार दिवस डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात जीवाच्या आकांताने उपचार केले. पण पाचव्या दिवशी अमोलने जीवनाशी घेतलेली लढाई हरली. पातुर्डा गावावर शोककळा पसरली. त्याच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, पाच बहिणी आणि मोठा आप्त परिवार मागे राहिला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर डिगे कुटुंबाला प्रशासनाने मदत द्यावी अशी मागणी हाेत आहे.