धुऱ्याच्या वादाने पेटला शेतशिवार! मोजणीच्या खुना उपटल्याचा आरोप; दोन शेतकऱ्यांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे; मेहकर तालुक्यातील नागापूरची घटना..

 
 डोणगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतजमिनीच्या धुऱ्यावरून सुरू झालेला वाद मोजणीसाठी रोवलेल्या लोखंडी खुना उपटण्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर दोन शेतकऱ्यांमध्ये चांगलाच राडा झाल्याचे समोर आले आहे. या वादात शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे परस्परविरोधी आरोप करण्यात आले असून, डोणगाव पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत.

 ​​​​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद अंबादास धाबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास अंजनी बु. शिवारातील गट क्रमांक ३२६ मध्ये ते काम करीत होते. यावेळी विलास गणपत धाबे तेथे आले. मोजणीसाठी रोवलेल्या लोखंडी खुना का उपटल्या, अशी विचारणा त्यांनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.यानंतर वाद वाढत जाऊन शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. तसेच खोट्या प्रकरणात अडकविण्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शरद धाबे यांनी केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी विलास गणपत धाबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दरम्यान, विलास गणपत धाबे यांनीही पोलिसांत स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अंजनी बु. शिवारातील गट क्रमांक ३२५ मध्ये रोवण्यात आलेल्या मोजणीच्या लोखंडी खुना शरद धाबे यांनी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास उपटल्याचा आरोप आहे.

याबाबत विचारणा केली असता शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे विलास धाबे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून शरद धाबे यांच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकाच शेताच्या धुऱ्याचा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. मोजणीच्या खुना नेमक्या कोणी उपटल्या, वादाची सुरुवात कशी झाली आणि दोन्ही बाजूंच्या आरोपांमध्ये नेमके तथ्य किती, याचा तपास डोणगाव पोलीस करीत आहेत. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय घिके करीत आहेत.