गव्हाचे काड पेटवल्यावर शेतात झोपले! झोपेतच चावला विषारी साप..शेतकऱ्याचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा! जळगाव जामोद तालुक्यातील घटना...

 
 जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील शिवापूर भागातील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा विषारी सापाच्या दंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रमेश नामदेव निंबाळकर असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, निंबाळकर हे ७ एप्रिल रोजी ईसाई (खेल लोण) शिवारातील स्वतःच्या शेतात गव्हाचा गवंडा जाळण्यासाठी गेले होते. सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास गवंडा पेटविल्यानंतर ते शेतातच विश्रांती घेत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला.
घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जामोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना खामगाव येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रुग्णवाहिकेतून नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ८ एप्रिल रोजी जामोद येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, तीन सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. दरम्यान, शेतात काम करताना सापदंशाच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांनी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.