झोपेची डुलकी जीवावर बेतली! समृद्धी महामार्गावर तरुण इंजिनियरचा मृत्यू....

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दिनांक १ जूनच्या मध्यरात्री १:३० वाजता समृद्धी महामार्गावर डोणगावजवळील २६८व्या चॅनल क्रमांकाजवळ भीषण अपघात झाला. भूषण बळीराम मगर (वय अंदाजे ३०, रा. माणका, ता. मालेगाव, जि. वाशिम) या तरुण अभियंत्याचा कारने ट्रकला दिलेल्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला.

भूषण मगर हे छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या माणका येथील घरी एमएच ३७ व्ही ९६५२ क्रमांकाच्या कारने परतत होते. समृद्धी महामार्गावर प्रवास करत असताना डुलकी लागल्यामुळे त्यांच्या कारने समोरून जात असलेल्या एमएच १६ सीडी ५७४७ क्रमांकाच्या ट्रकला मागून धडक दिली. धडकेमुळे कार थेट ट्रकच्या मागील भागाखाली गेली आणि अक्षरशः चुरडून गेली.
अपघात इतका भीषण होता की भूषण मगर गंभीर जखमी झाले. महामार्ग पोलिस आणि क्यूआरटी पथकाला माहिती मिळताच एपीआय संदीप इंगळे, चंद्रशेखर उबाळे आणि विकास कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ भूषण मगर यांना मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
भूषण मगर यांच्या पश्चात पत्नी, अवघ्या एक वर्षाचा मुलगा आणि आप्त परिवार असून त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.