धक्कादायक !उपचारासाठी आलेल्या महिलेची सोन्याची पोथ केली लंपास; जिल्हा सामान्य रुग्णायातील घटना; गर्दीचा फायदा घेत लंपास केली पोथ !

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारासाठी आलेल्या महिलेची पोथ अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही घटना २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान घडली.
फिर्यादी रंजना शिवलाल बच्चीरे (वय ४८, रा. बोरी आडगाव, ता. खामगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आई कमलबाई अश्रू सरसांडे यांना २० ऑगस्ट रोजी बुलढाणा येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्या आयसीयूमध्ये उपचार घेत असताना २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान रुग्णालयातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फिर्यादींच्या गळ्यातील सोन्याची पोत, ज्यामध्ये ३२ मणी व एक डोरले होते, वजन सुमारे साडेचार ग्रॅम, किंमत अंदाजे २५ हजार रुपये, लंपास केली.
याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोहेका शेख कय्यूम यांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेका प्रकाश बाजड करीत आहेत. सरकारी दवाखान्यासारख्या ठिकाणी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.