बोरगाव वसूत संतापजनक घटना! २२ वर्षीय दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार; शौचासाठी गेलेल्या तरुणीचा पाठलाग करून अत्याचाराचा आरोप; चिखली पोलिसांकडून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पीडित तरुणी बोरगाव वसु येथील स्मशानभूमीच्या पाठीमागील नाल्याजवळ शौचासाठी गेली होती. त्यावेळी सवणा येथील शेख रब्बानी शेख गणी (वय ३५) याने तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेच्या दिव्यांगत्वाचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
घटनेनंतर पीडितेच्या ४० वर्षीय आईने चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६४(२)(क), ७८, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यातील कलम ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii), ३(२)(५), ३(२)(va) तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या कलम ९२(ड) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.दिव्यांग तरुणीवर झालेल्या या कथित अत्याचारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.