बसमध्ये ४ शाळकरी मुलींना पाहताच विकृताचा धक्कादायक खेळ! 'मेरे पास बैठ' म्हणत पाठीवर फिरवला हात; मुली जीव वाचवण्यासाठी बसमधून उतरून पळाल्या,

 तरीही पाठलाग करून आडवा झाला! खामगावात आसिल खानविरुद्ध गुन्हा...

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरात चार शाळकरी मुलींचा कथित विनयभंग आणि पाठलाग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी खामगावात येणाऱ्या चार विद्यार्थिनींना एसटी बसमध्ये अश्लील इशारे करणे, त्यापैकी एका मुलीच्या पाठीवर हात फिरवणे, "मेरे पास बैठ" असे म्हणत जवळ बसण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करणे आणि बसस्थानकावर उतरल्यावरही त्यांचा पाठलाग करून पुन्हा अडवण्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी चारही मुलींच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी आसिल खान (रा. आवार, ता. खामगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सकाळची शाळा असल्याने खामगाव तालुक्यातील एका गावातील चार विद्यार्थिनी एसटी बसने खामगावकडे येत होत्या. त्याच बसमध्ये आरोपी आसिल खानही प्रवास करत होता. प्रवासादरम्यान आरोपीने मुलींकडे अश्लील इशारे केल्याचा तसेच त्यापैकी एका मुलीच्या पाठीवर हात फिरवून "मेरे पास बैठ" असे म्हणत जवळ बसण्यास सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या चारही मुली बस खामगाव बसस्थानकात पोहोचताच बसमधून उतरल्या आणि शाळेच्या दिशेने धावत सुटल्या. मात्र, आरोपीने त्यांचाही पाठलाग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शाळेकडे जात असताना आरोपीने पुन्हा मुलींना अडवून त्यापैकी एका विद्यार्थिनीला वाईट उद्देशाने इशारे करत, "मी इथे आलो आहे, माझ्या जवळ ये," असे म्हटल्याचा आरोप आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेल्या मुलींनी जीवाच्या आकांताने शाळा गाठली. शाळेत पोहोचल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटना शिक्षकांना सांगितली. त्यानंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चारही विद्यार्थिनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली.तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ आरोपी आसिल खान याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. भरदिवसा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींशी अशा प्रकारे गैरवर्तन झाल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.