धक्कादायक! सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची चिमुकल्यासह आत्महत्या; जांभाेऱ्याच्या महिलेची जिंतुर तालुक्यात आत्महत्या; सासरच्याविरुद्ध गुन्हा, पती आणि सासऱ्यास केली अटक...!
Aug 15, 2025, 16:16 IST
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सासरकडे हाेत असलेल्या छळाला कंटाळून जांभाेऱ्याच्या विवाहितेने माहेरी जिंतुर तालुक्यातील मानकेश्वर शिवारात दीड वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १३ ऑगस्ट राेजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिंतुर पाेलिसांनी सासरच्याविरुद्ध गुन्हा दाख केला असून विवाहितेचा पती सासऱ्यास अटक केली आहे. शारदा भरत देशमुख (२५) असे मृतक महिलेचे नाव आहे.
जांभोरा येथील शारदा देशमुख यांनी आपला दीड वर्षाचा चिमुकला मुलगा आदर्श याला सोबत घेऊन शंभू महादेवाच्या दर्शनाला जाते, असे घरात सांगितले होते. १० ऑगस्ट रोजी पती भरत देशमुखसोबत मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर पतीने तिला माहेरी बामणी येथे सोडले. मात्र शारदा आणि आदर्श तिथे पोहोचलेच नाहीत. कुटुंबीयांना त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. अखेर १२ ऑगस्ट रोजी पतीने शेवली पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलगा हरविल्याची तक्रार दिली. ही दुर्दैवी शोकांतिका १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली जेव्हा मानकेश्वर शिवारातील एका विहिरीत मायलेकरांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी सासरकडील मंळडीनी केलेल्या छळाला कंटाळूनच शारदा हीने आत्महत्या केल्याची तक्रार माहेरकडील लाेकांनी दिली आहे. त्यामुळे, जिंतुर पाेलिसांनी विवाहितेचा पती भरत देशमुख, सासरे नारायण देशमुख, सासू आणि जाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिंतूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पती भरत देशमुख आणि सासरे नारायण देशमुख यांना अटक केली आहे. पुढील तपास जिंतुर पाेलीस करीत आहेत.